पुणे : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (दि. 10 जून) मतदान होणार आहे. सहा जागांपैकी एका जागेवर चुरस होणार हे निश्चत असले तरीही त्यावर कोणता पक्ष शिक्कामोर्तब करणार यावर सध्या उलटसूलट चर्चा सुरू आहेत. मतदानाच्या वेळी आपले संख्याबळ कमी पडू नये याबाबत सगळ्याच पक्षांतर्गत काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान पिंपरी – चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप अॅम्ब्यूलन्स मधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आमदार जगताप आजारी असले तरीही आज ते मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये अटीतटीची लढत सुरु झाली आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी एकही आमदार बाहेर राहू नये किंवा मत वाया जाऊ नये यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
पिंपरी – चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप सुद्धा सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले आहेत. आमदार जगताप गेल्या दोन महिन्यांपासून आजारपणामुळे त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर त्यांना 2 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आल्या. आजारपणात काळजी म्हणून सक्तीचा आराम करण्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले होते. अशा परिस्थितीत जगताप यांनी मतदानासाठी मुंबईत जावे का या विचाराने कुटुंब संभ्रमात, काळजीत पडले होते, किंबहुना ते जगताप यांना मुंबईला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते, परंतु पक्षाच्या आग्रहामुळे त्यांच्या मुंबईवारीला कुटुंबियांकडून अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.