मुंबई : राज्यसभा निवडणूक 2022 च्या निकालात शिवसेनेवर भाजपने मात केली. यावरुन अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यात खासदार संजय राऊत यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील अशा शब्दांत राऊत यांनी यावेळी खोचक टोला लगावला.
राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी (दि. 10 जून) मतदान घेण्यात आले. यातील सहाव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले. मतदानाच्या वेळी आरोप – प्रत्यारोपाचा खेळ रंगला त्यामुळे मतदान निकालसाठी वेळ लागला, परंतु या निवडणुकीत महाविकास आघाडीला मात देत या विजयावर भाजपनेच नाव कोरले.
भाजपच्या यशानंतर माध्यमांनी खासदार संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी खा. राऊत म्हणाले, आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील. आम्हाला काय म्हणायचंय हे अपक्षांना माहित आहे. इथे कोणत्या पक्षांचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, असे म्हणत खा. राऊत यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
दरम्यान पंकजा मुंडे यांना डावलल्याचे सांगत खा. राऊत म्हणाले, पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असे म्हणून अनेक वगळल्या गेलेल्या मुद्द्यांना अनुसरून संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.