पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू गाव येथील शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यासाठी उद्या नरेंद्र मोदी देहूगावात येणार आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
१० पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, ३०० पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक असे एकूण २ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षसाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. २ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत.
नागरिकांच्या वाहनांची बायपासला सोय करण्यात आली आहे. खंडेलवाल चौकापासून परंडवाल चौकापर्यंत येण्यासाठी २० बस आहेत. तेथून चालत सभास्थळी यायचं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
गाडीची रिमोट चावी, पर्स, बॅग, पाणी बॉटल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पॉवर बँक आत नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे सभास्थळी जाणाऱ्या नागरिकांनी या वस्तू सोबत न आणता गाडीमध्येच ठेवाव्यात, असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे.