देहू संस्थान पदाधिकाऱ्यांकडून धार्मिक कार्यक्रमाला राजकीय रंग
अजित पवार यांना अपमानित करण्याचे षडयंत्र
पिंपरी : संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकपर्ण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी दिली नाही. यावरुन राज्यात वादंग निर्माण झाले आहे.
आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा दिल्लीतून पंतप्रधान कार्यालायतून ठरवण्यात आली होती, अशी माहिती तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली. मात्र खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांचे भाषण व्हावे यासाठी इशारे करत असतानाही देहू संस्थांच्या सदस्यांनी याकडे कानाडोळा केला. यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपमानित करण्याचे षडयंत्र देहू संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवत आपला खरा रंग दाखवला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
पंतप्रधानांना राजभवनातील पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचायचं असल्याने कार्यक्रमात अजित पवारांचं झालं नसावं, असं सांगितलं जात असले तरी पंतप्रधानांच्या नियोजित पुणे दौऱ्यात अजित पवारांच्या भाषणाचा उल्लेख नव्हता, असं भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. यावरून हा कार्यक्रम भाजप व देहू संस्थांन यांच्या समन्वयाने केला होता का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवार यांचं देहूच्या कार्यक्रमात भाषण न होणे हा राज्याचा अपमान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून अमरावतीत केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.