मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवार) देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संधी दिली गेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान मोदींचं भाषणासाठी नाव पुकारले गेले. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी खंत व्यक्त केली आहे. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना असायला हवे होते, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी खंत व्यक्त केली आहे.
अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल व काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करुन स्वपक्षाचा प्रचार केला असेल हा संविधानिक पदाचा अपमान आहे. मोदीजी चूक दुरुस्त करा, असे सांगत अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे.
तुकोबारायांचा ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी | नाठाळाचे काठी हाणु माथा |’ हा अभंग स्वत:वर उलटण्याची वेळ येऊ नये याची काळजी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या अध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्य़ांनी घ्यावी.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत इतके भान पंतप्रधान व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
श्री क्षेत्र देहू हे वारकरी धर्माचे पवित्र स्थळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सामान्य वारकरी म्हणून इथे आले असतील तर ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या तुकोबारायांच्या अभंगाचा त्यांना सोयीने विसर पडला व हा धार्मिक कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने राजकीय करुन टाकला. संतश्रेष्ठ तुकोबांच्या नगरीत हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच अमोल मिटकरी यांनी एकामागून एक ट्विट करत या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.