पिंपरी : पूनावळे येथे फॉर्म हाऊस भाड्याने घेऊन तेथे जुगार अड्डा चालविला जात असल्याचे उघडकीस आले असून पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या धाडीत तब्बल ९ लाख ९२ हजार ६५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत नंदराम सैद यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५६४/२२) दिली आहे. त्यावरुन ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पूनावळे परिसरातील कोलते पाटील लाईफ रिपब्लिक सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या फॉर्म हाऊसमध्ये बुधवारी मध्यरात्री सुरु होता.
फार्म हाऊस मालक मल्हारी मसगुडे (रा. सोमाटणे फाटा), जुगार अड्डा मालक जब्बार करीम शेख (रा. पडवळनगर, थेरगाव), अक्षय दिगंबर ननावरे (२४, रा. सुभाषनगर, पिंपरी), शांताराम सुखदेव भालेराव (३२, रा. पंचतारानगर, आकुर्डी),
व्यंकटेशन सितान्ना कादगीर (३८, रा. मामुर्डी, देहुरोड), वजीर अल्लाबक्ष पठाण (३६, रा. थेरगाव), केतन जगन्नाथ चेंडके (२४, रा. सोमाटणे फाटा), अविनाश दशरथ शिंदे (२३, रा. काळेवाडी), नारायण तुकाराम राठोड (३५, रा. येरवडा), शुभम लिंबाजी सांगोलकर (२५, रा. शितळानगर, देहुरोड), सुरज नरेश कदम (३०, रा. पडवळनगर, थेरगाव) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मल्हारी मसगुडे याच्या मालकीचा हा फार्म हाऊस असून त्याने तो महिना ३० हजार रुपयांना जब्बार शेख याला भाड्याने दिला होता. शेख हा या ठिकाणी इतरांना बोलावून जुगार अड्डा चालवित होता. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेला बातमीदारामार्फत पूनावळे येथील शेतातील फार्म हाऊसवर जुगार अड्डा चालू असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिद्र पंडीत यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या फार्म हाऊसवर छापा घातला.
जब्बार शेख हा जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी आत प्रवेश केल्यावर फार्म हाऊसमधील हॉलमध्ये पत्यांचा जुगार सुरु होता. रम्मी जुगाराला शेख याने जागा उपलब्ध करुन दिली होती. त्या तो जुगार खेळणार्यांकडून कमिशन घेत होता.