पिंपरी : “माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देतो काय, आता भेटला, आता खल्लासच करतो”, असे म्हणत तीन जणांनी मिळून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना चिखलीतील मोरे वस्ती येथे 13 जून रोजी सायंकाळी घडली तसेच आरोपींनी दहशत पसरविण्यासाठी दुचाकींची तोडफोडही केली.
याप्रकरणी रुपेश प्रमोद ठाकुर (24, रा. मोरेवस्ती चिखली) यांनी गुरुवारी (दि.16) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खवचे अज्या उर्फ अजय भारत जाधव (23), पपड्या उर्फ अजय शामराव सोनवणे (24, रा. मोरेवस्ती चिखली) आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रुपेश आणि त्यांचे मित्र लखन बसवराज गाडेकर यांनी एका प्रकरणात 15 एप्रिल रोजी आरोपींविरोधात चिखली पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. याचा राग मनात धरून आरोपी संगनमत करून 13 जून रोजी एकाच दुचाकीवर आले. त्यांनी रुपेशचे हात पकडले. त्यानंतर आरोपी जाधव याने माझ्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देतो काय, आता भेटला, आता खल्लासच करतो, अशी धमकी देत रुपेशच्या गळ्यावर कोयत्याचे तीन वार केले. त्यातील दोन वार रुपेशने चुकविले. मात्र, तीसरा वार त्याच्या खांद्याला लागला. त्यात तो जखमी झाले.
दरम्यान, या सर्व प्रकाराने घाबरलेल्या रुपेशने घटनास्थळाहून पळ काढला. त्यानंतर आरोपींनी रुपेशच्या आईच्या दुचाकीची मोडतोड केली. तेथील सिद्धेश्वर करताडे यांच्या आणि आणखी दोन दुचाकींचेही नुकसान केले. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.