संतोष जाधवच्या घरातून तब्बल 13 पिस्टल जप्त; आणखी 4 जणांना अटक

0

पुणे : पंजाबी गायक आणि काँग्रेसचा नेता सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर पोलिसांनी संशयित शार्प शूटर्सला ताब्यात घेतले. यामध्ये पुण्यातील संतोष जाधव याला याप्रकरणी अटक केली. पोलिसांनी संतोष जाधव याच्या घराची झाडाझडती घेतली असता तब्बल 13 पिस्टल सापडल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात कुख्यात गुन्हेगार संतोष जाधव याला पोलिसांनी अटक केली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने संतोष जाधव याला अटक केल्यानंतर मुसेवाला हत्या प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं. त्यातच संतोष जाधव आणि महाकाल याला आपण ओळखत असल्याचे लॉरेन्स बिश्नोई यानं मान्य केलं आहे. मात्र बिश्नोई टोळीत याचे महत्व अत्यंत किरकोळ असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. त्याचवेळी संतोष जाधव याच्याकडे केलेल्या तपासात पोलिसांना 13 पिस्टल मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी आणखी चार जणांना नारायणगाव येथून अटक केली आहे.

संतोष जाधव याच्याकडे तपास केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांना जुन्नर मधील एका वॉटर प्लांट व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मध्यप्रदेश मधून तब्बल 13 पिस्टल आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव परिसरात मोठी कारवाई करुन चार जणांना अटक केली. जप्त केलेल्या 13 पिस्टल सोबत एकही गोळी नसल्याने पोलिसांनाही हे पिस्टल नेमके कशासाठी आणली याचा तपास करावा लागणार आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी 2 आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

सौरभ महाकाल आणि संतोष जाधव यांच्या अटकेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक खुलासे झाले आहेत. लॉरेन्स बिष्णोई याला पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक पंजाबला जाऊन लॉरेन्सकडे तपास करुन आलंय. त्यांना दिलेल्या माहितीत लॉरेन्स हा संतोष आणि सौरभ महाकाल यांना ओळखत असल्याचं मान्य केले. मात्र, त्याचा मूसेवाला हत्या प्रकरणात सहभाग आहे की नाही याबाबत कल्पना नसल्याचं त्याने पुणे पोलिसांना सांगितलं.

संतोष जाधव हा इंस्टाग्राम आणि सोशल मीडियातून लॉरेन्सच्या संपर्कात आला होता.
त्याने नारायणगाव येथून पंजाबमध्ये पळ काढला होता. त्याठिकाणी लॉरेन्स बिश्नोई याने त्याची राहण्याची व्यवस्था केली.
तेव्हापासून तो लॉरेन्स टोळीच्या संपर्कात होता. सौरभ महाकाल ही लॉरेन्स टोळीच्या विक्रम बरार, सचिन बिश्नोई यांच्या संपर्कात होता. परंतु केवळ या टोळीचे नाव घेऊन गुन्हे करुन देखील या दोघांना काही हजारात रक्कम मिळत होती. त्यांचे राहणीमान अत्यंत खराब होते. परंतु सोशल मीडियाच्या माध्यामातून आभासी जगात फार मोठे गुन्हेगार असल्याचा आव आणून भविष्यात मोठी खंडणी वसूल करता येईल
किंवा पैसे मिळवता येतील या हेतूने मोठ्या कलाकारांची नावे घेऊन आपण त्यांची हत्या करणार होतो किंवा खंडणी वसूल करणार होतो हे पोलीस तपासात आरोपी सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींनी सांगितलेल्या सर्व तपासल्यावरच त्यावर विश्वास ठेवता येईल. आरोपी खोट्या प्रसिद्धीसाठी खोटं बोलत असण्याची शक्यता जास्त असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांचे चांगल्या घरातील अल्पवयीन मुलं फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्राम वर टाकल्या जाणाऱ्या हातात बंदूका असणाऱ्या रिल्स खऱ्या वाटून अल्पवयीन मुलं त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा मुलांच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांचे समुपदेशन करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.

ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलं अतिसामान्य गुन्हेगारांना त्यांचा आयडल समजत आहेत, त्यांनी प्रत्यक्ष आर्थिक परिस्थिती राहणीमान सगळं पहावं खरी स्थिती समजून घ्यावी आणि लगेच गुन्हेगारीचे आकर्षण सोडावे, असे आवाहन अभिनव देशमुख यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.