तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

0

देहू : कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या खडतर कालखंडानंतर “तुकाराम.. तुकाराम..” असा अखंड घोष अन् टाळ- मृदंगाचा गजर करीत यंदा वैष्णवांनी प्रस्थान सोहळ्यात हरिभक्तिचे रंग भरले.  सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या भक्तिकल्लोळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले.

तुकोबांच्या पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटेपासूनच देहूनगरीत उत्साही वातावरण होते. पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा आणि इतर विधी झाले. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत पालखी सोहळा काल्याचे कीर्तन आणि इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले.

दुपारी पावणे चारच्या सुमारास पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले. प्रस्थान झाल्यानंतर आज पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आदी उपस्थित होते.

पालखी सोहळा उद्या (मंगळवारी) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. तुकोबांची पालखी उद्या आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांमुळे पंढरीची वारी आणि वैभवी पालखी सोहळ्यापासून दूर असलेल्या वारकऱ्यांमध्ये यंदा पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी अमाप उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा भक्तिचैतन्याचा संग मिळणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.

संतांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर निघाले आहेत. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या खडतर कालखंडानंतर यंदाची पायी वारी मोकळ्या वातावरणात होत आहे. राज्य सरकारने सर्व निर्बंध उठवित यंदा पालखी सोहळ्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे समस्त वैष्ववजणांमध्ये मोठा उत्साह, आनंदाचे वातावरण आहे. देहूत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.