मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्र्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्पाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राज्यपालांना बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता गिरगावच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती.त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणा पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले.त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राज्यातील राजकीय घडामोडी वेगात घडत असून त्यात राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपालच रुग्णालयात दाखल झाल्याने संभाव्य राजकीय घडामोडींबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरते. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यपाल राज्य सरकारला विश्वासदर्शक मत सिध्द करण्याच्या सूचना देण्याची शक्यता होती. मात्र राज्यपालच रुग्णालयात दाखल झाल्यामुळे महाविकास आघाडीला किमान आठवडाभराचा कालावधी मिळाल्याची चर्चा होत आहे.