मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर काय करायचं? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर येऊन सांगायचं, तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको, मी राजीनामा देण्यास तयार आहे. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंनी इमोशनल उत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहोत. त्यांनी यावेळी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा दाखला देत उत्तर दिलं आहे. काँग्रेससोबत जायचं नाही, हे बाळासाहेबच बोलले होते. त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. समविचार पक्षांसोबत राहायचं ही बाळासाहेबांचे मुख्य विचार आहेत, अशी भावनिक साद एकनाथ शिंदे यांनी घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदे यांच्या समर्थक आमदारांशी चर्चा करत असून या चर्चेनंतर ते मुख्यमंत्र्यांना उत्तर देणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्यानं बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतात आले आहे.
विधानसभेतील बहुमतासाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची मॅजिक फिगर महाविकास आघाडी सरकारकडे नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.