मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रस्ताव बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यातच वेळप्रसंगी बहुमत सिद्ध करून दाखविण्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुकवरील संवादानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आघाडीतून बाहेर पडणे का गरेजचं आहे, हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव धुडकावत त्यांच्याकडे परत येणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनी मांडलेले चार मुद्दे
1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
3. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर?
एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. भाजपच्या या प्रस्तावावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि भाजपमध्ये यासाठी वाटाघाटी सुरू आहेत.