सत्ता स्थापनेस उशीर; बंडखोर आमदारांचा संयम सुटू लागला ?
संयम ठेवण्याचे सर्व आमदारांना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई : बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटीर आमदारांचा संयम सुटू लागला आहे. सत्ता स्थापना होणार का?, न्यायालयीन लढा किती वेळ लागणार?, पक्षाकडून कोणती कारवाई होणार ?, मतदार पुन्हा स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न बंडखोरी करुन गुवाहाटी मध्ये असलेल्या आमदारापुढे उभे झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच सर्व आमदारांना संयम ठेवण्याचे आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे करत असतांनाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दुसरीकडे तेथील काही आमदार शिवसेना नेत्यांना फोन करुन मध्यस्ती करण्याची विनंती करत असल्याचेही चित्र आहे. यामुळे आता बंडखोर माघारी फिरणार का ? असा प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.
महविकास आघाडी तसेच शिवसेना नेतृत्व एवढी मोठ्या प्रमाणात झालेली फूट बघून हतबल होईल, असे वाटत होते. मात्र आता बंडखोर कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बंड आवरते घेण्याच्या मनस्थितीमध्ये बंडखोर आमदार आले असल्याची माहिती मिळत आहे. फुटीर आमदारांना फक्त तीन दिवस बाहेर थांबण्याचे सांगण्यात आले होते. मात्र पाच दिवस झाल्यानंतरही सत्ता स्थापनेबाबत काहीच मार्ग दिसत नसल्याने या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. त्यांच्यात कमालीची अस्वस्थता दिसत आहे. त्यातच दिवस लांबल्याने संयम सुटत चालला आहे. काही आमदारांमध्ये गुवाहाटी येथे जोरदार अंतर्गत वादावादी झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
त्यामध्येच शिंदे यांच्या अध्यात्मिक गुरूने त्यांना या अमावास्येच्या आतच राजयोग येणार असल्याचे सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळेच विधानपरिषद निवडणूक संपताच तातडीने सर्व आमदारांना मुंबई येथून विधानभवनातूनच सुरत येथे नेण्यात आले होते. मात्र, राजकीय घडामोडी वेगाने घडल्याने सत्तेची समीकरणे बदलली. गुरूने दिलेला मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता स्वतः शिंदे सुद्धा परत फिरण्याच्या मनस्थितीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
गेले दोन दिवस एकनाथ शिंदे आमदारांना वारंवार संयमाचे आवाहन करीत आहेत. मात्र, मतदार संघातील वाढत्या असंतोषामुळे फुटीर आमदारांवर दबाव वाढत आहे. कुटुंबीय धास्तावलेल्या मानसिकतेत आहेत. गद्दारीचा शिक्का, पैसे खाऊन विकले गेल्याचा आरोप होत, असून कुटुंबाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशा प्रकारच्या व्यथा कुटुंबीय मांडत आहेत. त्यातच या सर्व आमदारांचे मोबाईल काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे कुणाशी संपर्क साधायचा असेल, तर हॉटेलमध्ये असलेल्या ठराविक व्यक्तीला सांगूनच फोन करावा लागतो. या सगळ्यामुळे फुटीर आमदारांमध्ये कमालीची आस्वस्था निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे विरुद्ध ठाकरे हा मोठा सामना सुरु आहे. यातच कायदेशीर कारवाईला सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजुंनी आपणच योग्य असल्याचे बोलले जात आहे. यातच नव्याने फुटीर आमदारांचा संयम सुटल्याची माहिती समोर येत आहे. यात नक्की काय होणार आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.