भाजप नेते राज्यपालांच्या भेटले; महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध करण्याची केली मागणी
विशेष अधिवेशन 30 जूनला?
मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. त्यानंतर आज फडणवीस दिल्ली गेले. दिल्लीत अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. दिल्लीवरुन आल्यानंतर फडणवीस यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर हे सर्व नेते राजभवनावर राज्यपालांना भेटण्यासाठी गेले. त्यामुळे राज्यातील सत्तानाट्याचा दुसरा भाग सुरु झाला आहे.
भाजपच्या नेत्यांची सागर बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर हे सर्व नेते राजभवनावर पोहोचले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. येत्या 30 तारखेला सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा अशी मागणी हे भाजप नेत्यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या मागणी नंतर राज्यपालांनी 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावलं असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले ; महाविकास आघाडी सरकारमधील 39 आमदारांनी पाठींबा काढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध करावे या मागणीचे पत्र पाठविले आहे.
दरम्यान, शिंदे गटात सहभागी झालेले बच्चू कडू आणि 10 आमदार उद्या मुंबईत येणार होते. ते राज्यपालांची भेट घेणार होते. दुसरीकडे शिंदे यांनी स्वत: आजचा एक दिवस उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यासाठी दिला होता. असे असताना गेल्या दिवसांपासून चिडीचूप असलेले भाजप नेते थेट राजभवनावर गेल्याने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.