मुंबई : नव्याने स्थापन झालेले राज्यातील सरकार हे फार काळ टिकणार नाही. सरकारमधील अनेकांची मंत्रिपदाची महत्वांकांक्षा आहे, मंत्रिपद मिळाले नाही तर ते नजीकच्या काळात स्वगृही परततील. त्यामुळे हे नवे सरकार पुढील काही महिन्यात कोसळेल. तेव्हा मध्यावधी निवडणुकांच्या कामाला आतापासूनच लागा, अशी महत्वाची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या नेते व कार्यकर्त्यांना दिली आहे.
राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार व प्रमुख नेते हजर होते. या बैठकीत पवारांनी सर्वांना व्यवस्थित मार्गदर्शन केले. हे सरकार फार तर सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा.
पवारांच्या दाव्यानुसार, नव्या सरकारमधील अनेकांना मंत्रिपदाची महत्वांकांक्षा आहे. आणि, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, तर ते स्वगृही परत येतील. त्यामुळे नव्याने स्थापन झालेले सरकार सहज कोसळण्याची शक्यता आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस सद्या विरोधी बाकावर बसणार असलो तरी, मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोरांपैकी अनेकजण स्वगृही परत येतील. हे सरकार अल्पमतात गेले तर ते पडेल, आणि मध्यावधी निवडणुका लागतील, त्यामुळे निवडणुकांसाठी आतापासून तयारीला लागा, अशी महत्वाची सूचना शरद पवार यांनी केली.
राज्यातील नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरु आहे. उद्या, सोमवारी बहुमत चाचणी होणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्यानंतर शिंदे सरकार टिकण्याची खरी कसोटी सुरु होणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहे.
दुसरीकडे, शरद पवार जे बोलतात त्याचा उलटा अर्थ घ्यायचा असतो, त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा या बोलण्याचा अर्थ घ्या, असा टोला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना लगावला आहे.