मुंबई : अगदी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. आज झालेल्या विश्वासमत दर्शक ठरावात शिंदे सरकारच्या बाजूने १४४ पेक्षा जास्त म्हणजे 164 मते पडली, तर काँग्रेसचे ५ आमदार आश्चर्यकारकरित्या गायब राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तिकडे दिल्लीतही सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला झटका दिला.
शिवसेनेचे गटनेते व मुख्य प्रतोद हटविण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, तातडीने सुनावणी घेण्यास न्यायपीठाने नकार दिला.
विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर अध्यक्षांनी आमदारांची शिरगणती केली. त्यात काँग्रेसचे ५ आमदार गैरहजर आढळले. त्यानंतर झालेल्या मतदानात शिंदे सरकारच्या बाजूने १६४ मते पडल्याचे दिसून आले. या मतदानादरम्यान पुन्हा एकदा विरोधकांनी गोंधळ घातला.
आमदार प्रताप सरनाईक यांनी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले असता, विरोधकांनी ईडी ईडी चे नारे लावले. सुरुवातीला ध्वनीमताद्वारे मतदान घेण्याचे ठरले. परंतु, विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर मतदानाद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात आली. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली.