मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजप सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर विश्वासदर्शक ठरावही जिंकला. यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवारांचे सर्वपक्षीय नेत्यांनी अभिनंदन केले. या अभिनंदन ठरावाला अजित पवार यांनी उत्तर दिलं. त्यावेळी बोलताना माझ्या कार्यकाळात एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही असा इशारा पवार यांनी नवीन सरकारला दिला.
अजित पवार म्हणाले, मी लोकसभेला देशात नंबर दोनच्या मतांनी निवडून आलो होतो. पहिल्या क्रमांकावर रामविलास पासवान निवडून आले होते. मी गॅलरीतून अनेकदा काम पहायचो. शरद पवारांमुळे लहानपणापासून राजकारण जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. इथे आल्यानंतर इतरांकडे पाहून मी शिकलो असं अजित पवारांनी सांगितले.
माझ्या कार्यकाळात एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असा विश्वास मी राज्यातील जनतेला देतो.
यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो.
यापूर्वी अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात जनतेचे मुद्दे उपस्थित केले. तशीच चर्चा घडवण्याचं काम आपण करु असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या दुबार पेरणीचे संकट आलं आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा जनतेची असते. सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळाला नाही तर ते विरोधी पक्षाकडे जातात. आपण कायम न्याय मिळवून देण्यासाठी काम करु असं अजित पवार यांनी नमूद केलं.