मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या पंधरा दिवसात अनेक व्टिस्ट आणि टर्न बघितले आहेत. राजकारणातील सध्या सुरु असलेले धक्कातंत्र अद्यापही सुरु आहे.सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणीवेळी आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटाचा व्हिप झुगारला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मतदान केले. पण त्यांना निलंबनाची नोटीस पाठविण्यात आली नाही.
एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात असलेल्या 15 पैकी 14 आमदारांना निलंबनाची नोटीस पाठविली आहे. व्हिप पाळला नाही,याबाबत ही नोटीस पाठविली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना निलंबनाची नोटीस पाठविली नाही.
सोमवारी बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे यांनी 164 मत मिळविली होती तर त्यांच्या विरोधात 99 मते पडली होती. आता आदित्य ठाकरे यांना का नोटीस पाठविली नाही यावरुनही चर्चा रंगू लागल्या आहेत.
याबाबत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस बजाविली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर करतो.याच कारणामुळे आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस बजाविली नाही.दरम्यान, आता शिवसेनेच्या उर्वरीत आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सोमवारी शिवसेनेच्यावतीने सुनील प्रभू यांनीही व्हिप जारी केला होता. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मतदान करावं, असे त्यात म्हंटले होते. दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीसुध्दा व्हिप जारी करीत शिंदे यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या होत्या.