पुणे : मंगळवार पेठेतील अण्णा कुंभार याच्या एसी जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकून ३६ जणांवर कारवाई केली होती. तेथून तब्बल ६ लाख रुपयांचा माल जप्त केला होता.
शहरातील अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यास त्याला संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला होता.
समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांची बदली गुन्हे शाखेतील पोलीस कल्याण पदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक रमेश साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक विश्वास गोळे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. मानवी संसाधन विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पोर्णिमा तावरे यांची वानवडी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. वानवडीचे सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांची सहायक आयुक्त प्रशासनपदी नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले आहेत.