मुंबई : विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. त्याआधी निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असतील. मात्र यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन केलं आहे.
कोणीही गाफील राहू नका आणि गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना केलं आहे. सर्वतोपरी लढाई लढू, पण चिन्ह हातून गेल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कमीत कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहचावं म्हणून कामाला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. धनुष्यबाण चिन्ह गेल्यास उद्धव ठाकरेंसमोर मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांमध्ये मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
“कायद्याने जो लढा द्यायचा आहे तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तर गाफील राहू नका. शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघऱी पोहोचवा,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत आणि भरत गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत असा निर्वाळा देत शिवसेनेला झटका दिला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्याऐवजी शिवसेना आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्ष गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर त्यावेळी महाराष्ट्राबाहेर असलेल्या एकनाथ शिंदे गटाने शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत आणि मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रविवारी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड केली. निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी अजय चौधरी यांची शिवसेना गटनेते पदी आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती रद्द केली. तसेच एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत आणि भरत गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत यास मान्यता दिली.