माजी पोलीस आयुक्तांवर CBI ने केला गुन्हा नोंद

0

मुंबई : मुंबई पोलीसचे माजी आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्यावर घरावरही छापा टाकला आहे. १९८६ बॅचमधील आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. 

३० जूनला संजय पांडे सेवानिवृत्त झाल्यानंतर ईडीनेही त्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं होते. आता सीबीआयनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांनी एक ऑडिट कंपनी स्थापन केली होती. २०१८ पासून सीबीआय एनएसई स्कॅमचा तपास करत आहे. २००९ ते २०१७ या काळात शेअर मार्केटमधील कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नोटीस बजावल्याने पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. पांडे यांची मंगळवारी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. संजय पांडे हे ३० जूनरोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांना ईडीच्या चौकशीला तोंड द्यावे लागले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे यांनी २००१ मध्ये एक आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. त्यादरम्यान पांडे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारल्याने ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. संबंधित कंपनीत मुलगा आणि आईला त्यांनी संचालकपदी नेमले. २०१० आणि २०१५ च्या दरम्यान पांडे यांच्या या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. दरम्यान सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) घोटाळ्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीदेखील याप्रकरणी चौकशी करत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.