मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा

मुरली आणि जिजाबाई नवले या दाम्पत्यासही मिळाला मान

0

पंढरपूर : महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह आज (दि. १० जुलै) श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची आषाढी एकादशीची महापूजा केली. यंदाच्या महापूजेचा मान बीडमधील गेवराई तालक्यातील रुई गावातील मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या वारकरी दाम्पत्यास मिळाला. हे दाम्पत्य गेले २० वर्षे पंढरीची वारी करत आहे.

महापूजेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. शनिवारी (दि.९ जुलै ) पुणे येथून कारने मुख्यमंत्री कुटुंबियांसोबत पंढरपुरात रात्री साडेअकरा वाजता पोहोचले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. आज (दि. १० जुलै) पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू झाली.

पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन, पावणेसहा वाजता नदी घाटाचे लोकार्पण, सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा, पावणेबारा वाजता पंढरपूरच्या पंचायत समितीतील स्वच्छता दिंडीत सहभाग, दुपारी साडेबारा पक्ष मेळाव्यास उपस्थिती, असे मुख्यंत्र्यांचे दिवसभराचे कार्यक्रम आहेत.

दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री कारने सोलापूर विमानतळाकडे रवाना होतील आणि तेथून शासकीय विमानाने मुंबईत दाखल होतील. सायंकाळी साडेचार वाजता मुंबई विमानतळ येथे मुख्यमंत्र्यांचलचे आगमन होईल. त्यानंतर ते ठाण्यातील निवासस्थानासाठी रवाना होतील.

राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना महापूजेत सहभागी होता येईल किंवा नाही, याबाबत चर्चा सुरू झाली होती. जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे त्याबाबत परवानगी मागितली होती. ती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्याहस्ते महापूजा आणि पंढरपूर दौरा नक्की करण्यात आला.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदें यांच्या पाठोपाठ चार टेम्पो ट्रॅव्हलरमधून त्यांचे नातेवाईक आणि समर्थक पोहोचले. त्यामुळे चंद्रभागा स्नानाल जाणाऱ्या वारकऱ्यांची रांग काही वेळेसाठी थांबवण्यात आली होती. त्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये काही काळ वादावादी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.