पणजी : महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय खलबतांना वेग आलेला आहे. गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपा आता तिथेही ऑपरेशन लोटस राबवत असल्याची चिन्हें दिसत आहेत.
गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसमधले ९ विद्यमान आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी १० जुलै २०१९ ला काँग्रेसचे १० आमदार भाजपात सामील झाले होते. आज बरोबर तीन वर्षांनंतर याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपाचे केंद्रीय नेते गोव्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे आता आषाढी एकादशीचा मुहुर्त साधत भाजपा ऑपरेशन लोटस राबवणार का या चर्चांना उधाण आले आहे. आता गोव्यातल्या काँग्रेसची शिवसेना होणार का, याकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागलेले आहे.