पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून आमदारांचे केले कौतूक

0

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना हादरून गेली असून डागडुजी करण्याचे प्रयत्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेते सातत्याने करत आहेत. एकाच वेळी 40 आमदारांना घेऊन शिंदे यांनी सूरतेचा रस्ता धरल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले, शिवाय पक्षाची मोठी हानी झाली. परंतु अशाही परिस्थितीत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या 15 आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भावनिक पत्र लिहून त्यांच्या निष्ठेचे कौतूक केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी या पत्रात लिहिले आहे की, जय महाराष्ट्र ! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे.

शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या, प्रलोभनांना बळी न पडता आपण शिवसेनेसोबत राहिलात आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळाले. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो.

आदित्य ठाकरे यांच्यासह वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, उदयसिंह राजपूत, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, नितीन देशमुख, कैलास पाटील आणि राहुल पाटील हे आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आजही आहेत. हे आमदार कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.