पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका लॉजमध्ये 24 वर्षे तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. स्वारगेट-सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये हा प्रकार घडला. दीप्ती काटमोडे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, प्रियकर प्रेयसीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. रात्री दोघेही सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये आले होते. दरम्यान आज सकाळी रूमची साफसफाई करण्यासाठी कर्मचारी गेला असता त्याला बाथरूममध्ये ही तरुणी रक्ताच्या थरोळात पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रियकर प्रेयसीच्या वादातून शुल्लक कारणावरून प्रियकराने तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर आरोपी पसार झाला आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.