पुणे : सध्या सर्वदूर पाऊस आहे.. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत तर डोंगर देखील हिरवेगार झाले आहेत.. निसर्गाचे हे रूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जाताना दिसतात.. मात्र उल्हासनगर येथून भीमाशंकर परिसरात पर्यटनासाठी आलेल्या सहा तरुणांना जन्माची अद्दल घडविणारा अनुभव आलाय.. पर्यटनासाठी आलेले हे तरुण मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यात असल्यामुळे भीमाशंकर परिसरातील एका खोल दरीत अडकून पडले होते.. मात्र हे तरुण वाट चुकले असून अडकून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर घोडेगाव पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने या सहा तरुणांची सुटका केली आहे.
अंकुश सत्यप्रकाश तिवारी, हितेश श्रीनिवास यादव, पवन अरुण प्रताप सिंग, सर्वेश श्रीनिवास जाधव, दिनेश धर्मराज यादव आणि नीरज रामराज जाधव अशी या सहा तरुणांची नावं आहेत. हे सर्व तरुण उल्हासनगर येथील रहिवासी आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, या सर्व तरुणांनी मुंबईजवळ असणाऱ्या मुरमाडच्या जंगलातून ट्रेकिंगला सुरुवात केली होती. भीमाशंकरच्या दिशेने 20 ते 25 किलोमीटर अंतर चालल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि धुकेही वाढले. अशातच सायंकाळचे पाच वाजले आणि अंधारही पडू लागला त्यामुळे त्यांना पुढचा रस्ता ही दिसेनासा झाला. त्यामुळे हे सर्व तरुण घाबरून गेले. सुदैवाने मोबाईलला रेंज असल्यामुळे यातील काही लोकांनी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मोबाईलवर आपले लोकेशन पाठवले. त्यानंतर घरच्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीही तातडीने या तरुणांची माहिती घेतली आणि त्या दिशेने प्रवास सुरू केला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी हे लोकेशन शोधून काढलं. आणि त्यानंतर दोरीच्या सहाय्याने या सहाही तरुणांना सुखरूप बाहेर काढलं. सायंकाळी सात वाजता सुरू केलेली ही मोहीम रात्री बाराच्या सुमारास संपली. घोडेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने आणि त्यांच्या टीमने तत्परता दाखवत या सहा तरुणांना सुखरूप घरी पोहोचवले.