हिंगोली : कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेने काल हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर पक्षालाच आव्हान देणार्या बांगर यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे मन वळवण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. जिल्ह्यातील सहापैकी 5 तालुकाप्रमुख आणि सर्व उपजिल्हाप्रमुख, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील इतर सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईमध्ये झाली. पुढील काही दिवसांत नवीन जिल्हाप्रमुख जाहीर करू, उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुखपदासाठी अनेकजण मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे समजते.
सेनगाव तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, हिंगोली तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख रमेश शिंदे,
त्याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील काही जिल्हा परिषदेचे सदस्य व पदाधिकारी यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.
स्वत: उद्धव ठाकरे हे हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या संपर्कात होते. त्यांनी अनेक वेळा फोनवरून शिवसैनिक व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला. त्यामुळे संतोष बांगर यांच्या बंडानंतरही पक्षाचे नुकसान रोखण्यात ठाकरे यांना यश आले आहे.