मुंबई : भायखळा येथील दोन शिवसैनिकांवर गुरुवारी रात्री हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रारही घेतली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी भायखळामध्ये जाऊन त्या शिवसैनिकांची विचारपूस केली. तसेच जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील रामभाऊ भोगले मार्गावरील 208 नंबरच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची विचारपूस केली. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला केला होता.
शिवसैनिकांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना शाखेत जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला, त्यांना आधार दिला. शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तरी खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी संबंधितांना दिला. तसेच पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करत त्यांनाही झापलं.
संरक्षण का नाही दिलं ? असा जाब उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना विचारला. यावेळी पोलिसांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांचं रक्त न सांडण्याचं मी आव्हान करतोय. मात्र असं होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. कारवाई झाली पाहिजे.
तुम्ही तात्काळ कारवाई करा. आरोपींना तुम्ही चौकशीसाठी का बोलवलं नाही ? अस कधी झालं नव्हतं. तुम्ही राजकारणात पडू नका, असेही त्यांनी पोलिसांना सांगितलं. दरम्यान भायखळा पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, असं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.