पिंपरी : प्रियशीला फिरवण्यासाठी वेगवेगळ्या गाड्या पाहिजेत यासाठी चक्क 13 दुचाकी आणि 2 चारचाकी गाड्यांची चोरी करणाऱ्याला अटक केली आहे. निगडी पोलिसांनी या प्रियकराला अटक केली असून त्याच्याकडून तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यश किरण सोळसे (20 रा. रा. तळेगाव एमआयडीसी रोड, तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याच्यावरील निगडी पोलीस ठाण्यातील तीन, सांगवी पोलीस ठाण्यातील चार, तर तळेगाव दाभाडे, पिंपरी व देहुरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे 14 गुन्हे उघड झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस बुधवारी (दि.13) ट्रान्सपोर्ट नगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी एक लाल रंगाची मारुती 800 ही कार संशयितरीत्या परिसरात फिरताना दिसली. यावेळी कार चालवणाऱ्या सोळसे याला पोलिसांनी हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तो चालवत असलेली कार निगडी प्राधिकरण येथून सात दिवसांपूर्वी चोरीला गेल्याचे समोर आले.
त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याच्याकडून 13 चोरीच्या मोटार सायकल व 2 चारचाकी अशा एकूण 3 लाख 45 हजार रुपयांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. या चोऱ्या तो केवळ त्याच्या प्रेयसीला नवनवीन गाड्यातून फिरता यावे यासाठी करत असल्याचे त्याने पोलीस तपासात सांगितले.
हि कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोरडे, पोलीस हवालदार सुधाकर अवताडे, सतीश ढोले, दत्तात्रय शिंदे, विलास केकाणे, पोलीस नाईक शंकर बांगर, विनोद व्होनमाने, सोमनाथ दिवटे, विजय बोडके, भुपेंद्र चौधरी, राहूल गायकवाड, तुषार गेंगजे, राहूल मिसाळ यांनी केली.