भाजपचे सात; फुटीर गटाच्या पाच जणांचा बुधवारी शपथविधी?

0

मुंबई : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन दोन आठवडे उलटले तरी, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, म्हणून विरोधक जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांनी अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निवडला असून, फुटीर गटाच्या पाच जणांसह १२ ते १३ जणांचा बुधवारी शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती राजकीय सूत्राने दिली आहे.

या मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांनी शक्तिप्रदर्शन करत, मंत्रिपदासाठी जोर लावला होता, त्यांना धक्का बसण्याची शक्यता असून, गिरीश महाजन यांचेही तळ्यात मळ्यात असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले व मंत्रिपदासाठी प्रचंड ताकद लावून असलेले आमदार परत उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता पाहाता, हा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होण्याची शक्यताही सूत्राने बोलून दाखवली आहे. त्यामुळे बुधवारी किंवा पुढील एक दोन दिवसांत १० ते १२ मंत्री शपथ घेतील, व उर्वरित आमदारांना आशेवर ठेवले जाईल, असेही हे सूत्र म्हणाले.

राज्यात सत्ता आणण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी डिमोट केल्यानंतर भाजपचे दिल्ली हायकमांड फडणवीस यांच्याशी एकनिष्ठता दाखवणार्‍यांनाही धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, २० जुलैरोजी मंत्री शपथ घेऊ शकतात, असेही सांगण्यात आले.

एकनाथ शिंदे गट व भाजपच्या आमदारांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिलेले आहेत. पहिल्या टप्प्यात १० ते १२ जण शपथ घेतील.

अधिवेशन झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात काहींना शपथ दिली जाईल, तर काही जागा मुद्दाम खाली ठेवल्या जातील. जेणे करून या जागांचे आमिष दाखवत, बंडखोर आमदार परत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार नाही, याची काळजी शिंदे व फडणवीस हे घेणार आहेत, असेही राजकीय सूत्राने स्पष्ट केलेले आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायद्याला धरून झालेलेच नाही. कायद्याला धरून झाले असते तर आतापर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. पण तो झाला नाही. याचाच अर्थ कायद्याचा आणि घटनेचा काही तरी पेच निर्माण झाला आहे. नाही तर जे सरकार फक्त सत्तेसाठी निर्माण झाले आहे, जे आमदार केवळ मंत्रिपदासाठी फुटले आहेत ते इतके स्वस्थ का बसले असते? कारण त्यांना माहीत आहे. आपण शपथ घेतली तर आपली आमदारकी धोक्यात येईल आपले सरकार धोक्यात येईल, म्हणूनच ते स्वस्थ आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.