पुणे : भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या महिलेने आज पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार श्रीकांत देशमुख यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची आणि श्रीकांत देशमुख यांची ओळख एका कॉमन मित्रांच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेसोबत ओळख वाढवून, लग्न करण्याचे आमिष दाखवून, घर घेण्याचे आमिष दाखवून, गावाकडील जमिनीचा वाद मिटवून देण्याचे तसेच पीडितेच्या केसाची ट्रीटमेंट करून घेण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले.
पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार श्रीकांत देशमुख यांनी पीडितेसोबत सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह, मुंबई येथील हॉटेल, पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील हॉटेल आणि सांगलीतील एका लॉजमध्ये वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते. आरोपीने फिर्यादी महिलेला पत्नीपासून लवकरच विभक्त होणार असून नंतर आपण लग्न करू असे आश्वासन दिले होते. परंतु, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. यामुळे फिर्यादीने अखेर डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सोलापूर येथील पोलीस ठाण्यात वर्ग केला जाणार आहे अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.
या प्रकरणी तिने सविस्तर व्हिडीओ करून श्रीकांत देशमुख यांच्या फसवणुकीची माहिती दिली होती. तसेच, त्यामुळे त्यांना भाजपने पक्षातून काढून टाकले होते.