पिंपरी : दाम दुप्पट व सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष आळंदीतील एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगाशी आले असून दोन्ही गुंतवणूकीतून सुमारे 58 लाख रुपयांचा गंडा बसला आहे. ही फसवणूक 9 मे 2019 ते जुलै 2022 या कालावधीत झाली असून भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 17) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक कैलास करडुले (31 रा.आळंदी देवाची) यांनी फिर्याद दिली असून मुनिंद्र मिलींद तुळवे (रा. वडाळा मुंबई), एक महिला आरोपी व संदिप मोहिते (रा. फलटण),पारस जैन (रा. मुंबई), सनी इंगळे (रा.वाकड) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करडुले हे व्यावसायीक असून त्यांना तुळवे व त्याची साथीदार महिला याने रिच क्लब कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. यातून दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले त्यानुसार करडुले यांनी 41 लाख रुपये कंपनीत गुंतवले. तर दुसऱ्या घटनेत करडुले यांनी संदिप मोहिते,पारस जैन, सनी इंगळे यांच्याकडे सोने खरेदीसाठी 17 लाख रुपये गुंतवले. मात्र या दोन्ही गुंतवणुकीतून करडुले यांना अद्याप कोणताही परतावा मिळालेला नाही.यानुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.