पिंपरी : घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 31 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. चोरीचे मोबाईल हे थेट उत्तरप्रदेशात विकले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
दत्ता संतोष धोत्रे (20, रा.ओटास्कीम, निगडी) व शामनारायण सिंह (22, रा. म्हाळुंगे, मुळ उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी, तळवडे, म्हळुंगे येथील होणाऱ्या मोबाईल चोरांचा शोध घेत असताना बुधवारी धोत्रे हा ओटास्कीम येथे मोबाईल विक्री करणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन अत्याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केलेले फोन हर्षितला विकल्याचे सांगितले. हर्षित हा धोत्रेकडून घेतलेले फोन उत्तरप्रदेशमध्ये विकत असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी म्हाळुंगे परिसरात जाऊन हर्षितलाही अटक केली. यावेळी त्यांच्याजवळील 3 लाख 20 हजार रुपयांचे 31 फोन जप्त केले आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यावेळी पोलिसांनी मोबाईल चोरीला गेलेल्या तक्रारदारांनी निगडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे, विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाने केली आहे.