पिंपरी : महागड्या बाईक तसेच घरातील मोबाईल फोन अगदी शिताफीने चोरणाऱ्या चोरांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) रात्री आठच्या सुमारास केली. यावेळी पोलिसांनी पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संदेश प्रभाकर पाटोळे (23 रा. जालना), सुरज राजू कसबे (21 रा. जालना) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालुंब्रे येथे 16 जुलै रोजी एकाच रात्रीत एकाच बिल्डींगमधील घरातून चार मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार महाळुंगे पोलिसांकडे आली होती. त्यानुसार पोलीस ठाण्याची दोन पथके चोरांचा शोध घेत होती.
यावेळी तांत्रिक तपासात चोरी करून चोरटे केटीएम बाईकवरून पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर माध्यमांच्या सहाय्याने चोरट्यांची ओळख पटवली. चोरटे चोरी करून जालना येथे फरार झाले होते. मात्र जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या.
त्यांच्याजवळून प्रत्येकी एक लाख रुपये किंमत असणाऱ्या सहा केटीएम बाईक, एक मोबाईल व चांदिचे दागिने असा एकूण 4 लाख 92 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. याचा पुढील तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.