पुणे : उत्तरप्रदेशातील भदाेई येथील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णू मिश्रा (34) याला सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात रविवारी रात्री पुणे येथून अटक करण्यात आली आहे. ही माहिती पाेलिस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी दिली.
पुण्यात हडपसर परिसरात ऑक्सिजन विला या अलिशान इमारतीत भाड्यातून घर घेऊन राहत होता. मागील वर्षापासून तो फरार हाेता. उत्तरप्रदेश पाेलिसांचे पथक त्याचा शाेध घेत हाेते, परंतु त्याचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता.
विष्णु मिश्रा याचे वडील विजय मिश्रा हे उत्तरप्रदेश मधील भदाेईचे माेठे प्रस्थ असून ते 40 वर्ष आमदार हाेते. रविवारीच विजय मिश्रा यांची मुलगी रामी पांडे हिने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भाऊ विष्णु मिश्रा याच्या जिवाला धाेका असून उत्तरप्रदेश पाेलिस त्याचे एनकाऊंटर करु शकतात असे सांगितले होते.
संशयित विष्णू मिश्रा हा सामूहिक बलात्काराच्या गंभीर गुन्हयात आराेपी आहे. मात्र, त्याची पार्श्वभूमी माेठी असल्याने ताे मागील दहा महिन्यापासून सापडत नव्हता. त्यामुळे पाेलिसांच्या कार्यपध्दतीवरही शंका उपस्थित हाेऊ लागल्या हाेत्या. उत्तरप्रदेश पाेलीसांचे एसटीएफ पथक त्याचा कसून शाेध घेत हाेते अखेर तो गळाला लागलाच.
संशयित विष्णु मिश्रा याच्यावर गाेपीगंज पाेलीस स्टेशन, भदाेई, उत्तरप्रदेश याठिकाणी आयपीसी 323, 504, 449, 347, 387,419, 420, 467, 68, 471, 474, 120 ब, 379, 376, 342 व 506 नुसार गुन्हा दाखल आहे. विष्णु मिश्रा यास सदर गुन्ह्यात फरार घाेषित करुन अपर पाेलीस महानिदेशक वाराणसी यांनी त्याच्याबाबत माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले हाेते.