शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना ही राक्षसी महत्त्वाकांक्षा

'आई ही शेवटी आई असते'

0

मुंबई : शिवसेना कायद्याची व रस्त्यावरची लढाई जिंकेल. ज्यांनी विश्वासघात केलाय, पक्ष फोडलाय त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून मते मागावीत.

शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका. शिवसेनेने तुम्हाला काय दिलं नाही?’ असा सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना थेट सवाल केला आहे. आपल्या या महामुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि बंडखोरांवर जोरदार आसूड ओढला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहत झाली आहे.

शिंदे गटाने बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. या सगळ्या भूकंपानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून आपल्या रोखठोक बाजू मांडली.

यावेळी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार घणाघाती प्रहार केला.

1 – यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय.

तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं?

2- जेव्हा शिवसेना विरोधी पक्षात बसली होती तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की, शिवसेना आता संपेल. पण त्या वेळी शिवसेना एकाकी लढली आणि 63 आमदार निवडून आले.

त्या काळात विरोधी पक्षाचीही जबाबदारी आपल्यावर आली होती, तेव्हा मी पद कुणाला दिलं होतं?

3- ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये.

तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना?

तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं.

4- जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती.

तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात.

5 – त्यांना शिवसेना संपवायची आहे. जे शिवसेनेसोबत ठरवलं होतं अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद. तेच तर तुम्ही आता केलंत आणि ते जर तेव्हा केलं असतं तर निदान पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाला एकदा तरी अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं असतं.

ही जी काही आता सोंगं ढोगं करतायत की आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं ती करावी लागली नसती आणि आता ते म्हणताहेत की ‘आमची’ शिवसेना ही शिवसेना नाहीये. हे सगळं तोडफोड करून त्यांचं समाधान होत नाही, कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे.

6- ठाणेकर सुज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे तो म्हणजे ठाणेकर नाहीत.

ठाणेकर म्हणजे ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे जे नातं आहे ते या पालापाचोळ्यांना तोडता येणार नाही. त्याच्यामुळे मी तर म्हणेन पूर्ण महाराष्ट्र म्हणजेच त्यात ठाणे आणि मुंबईसुद्धा आले, ते निवडणुकांची वाट पाहात आहेत.

7- या गटाला कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये विसर्जित किंवा सामील व्हावं लागेल. मग त्यांच्यासमोर पर्याय काय आहे?

एकतर भाजपात जावं लागेल, नाहीतर दुसरे सपा, एमआयएम वगैरेसारखे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्याकडे जावं लागेल. आणि हे जर कोणत्या पक्षात गेले तर भारतीय जनता पक्षाचा यांना जो उपयोग करून घ्यायचा आहे तो उपयोग संपेल.

8- लोकं निवडणुकांची वाट पाहात आहेत. आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही.

लोकं म्हणतात निवडणुक येऊ द्या.. यांनाच पुरून टाकतो.

9- दोन गोष्टी आहेत. समजा मी त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं.

त्यांनी आणखी काहीतरी वेगळं केलं असतं. कारण त्यांची भूकच भागत नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात?

ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात. म्हणजे दिलं तरी माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, इथपर्यंत होतं. आता याचं तेही माझं आणि त्याचं तेही माझं.

इथपर्यंत यांची हाव गेली आहे. या हावरटपणाला काही सीमा नसते.

10- राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. नुसते आईवर वार करणारे असं आपण म्हणत होतो.

पण केवळ तसं नाहीये. राजकारणात ज्यांनी यांना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली अवलाद आहे. पण तितकी ताकद त्यांच्यामध्ये नाही. कारण आई ही शेवटी आई असते.

Leave A Reply

Your email address will not be published.