पश्चिम बंगाल : येथील शिक्षक घोटाळ्याप्रकरणी अर्पिता मुखर्जींच्या अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी बेलघरियातील त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटवर छापा टाकला. 18 तास चाललेल्या छाप्यात EDला 29 कोटींची रोकड मिळाली आहे. नोटा मोजण्यासाठी तीन मशीन लावण्यात आल्या होत्या. यासोबतच 5 किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे.
23 जुलै रोजीही EDने मंत्री पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. अर्पिताच्या घरातून 21 कोटी रुपये रोख आणि 1 कोटी रुपयांचे दागिने सापडले आहेत. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची अनेक बंडले एका खोलीत पिशव्या आणि बॅगमध्ये ठासून भरलेली होती. एजन्सीला कागदपत्रेही मिळाली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
अर्पिता यांच्या दोन्ही घरांतून आतापर्यंत 50 कोटींहून अधिक रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे. अर्पिता यांच्या बेलघरिया टाऊन क्लबमधील दोन फ्लॅटपैकी एक फ्लॅट EDने सील केला आहे. नोटीसमध्ये अर्पिता यांना 11,819 रुपये मेंटेनन्स न भरल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यांच्या फ्लॅटबाहेर नोटीस लावून ही माहिती देण्यात आली आहे.
EDने बुधवारी पुन्हा मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले. रिपोर्ट्सनुसार, EDने पार्थ आणि अर्पिता यांच्या 5 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. EDच्या पथकाने कोलकाता आणि आसपासच्या पाच ठिकाणी, अर्पितांचे कार्यालय, नातेवाईकांची घरे आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बेलघरिया आणि राजदंगा येथील इतर फ्लॅटवर छापे टाकले.