पिंपरी : वैद्यकीय विभागात चालक म्हणून नोकरीला लावतो असे सांगून तरुणाची साडेसहा लाखांची फसवणूक केली. यातील विशेष बाब म्हणजे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिवांचे बनावट सहीचे पत्र संबंधिताला देण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हा प्रकार 9 मार्च ते 21 ऑगस्ट 2021 या कालावधीत देहूगाव, विमाननगर, निगडी, आमदार निवास मुंबई येथे घडला. गणपत एकनाथ गीते (37, रा. मोशी) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुभम सुनील पाटील (26, रा. अंमळनेर, ता. अंमळनेर, जि. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गीते हे पिंपरी-चिंचवड मधील एका खाजगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत आहेत. सन 2004 पासून ते स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. दरम्यान, सन 2015 मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांच्याकडून रुग्णवाहिका चालक पदासाठी 42 जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली. यामध्ये गीते यांच्या प्रवर्गासाठी दोन जागा असल्याने त्यांनी परीक्षा दिली.
यामध्ये मेरिट लिस्टमध्ये त्यांचे तिसर्या क्रमांकावर नाव आले. दरम्यान, काहींना नोकरीसाठी पत्र मिळाले. मात्र, गीते यांना पत्र मिळाले नाही. याबाबत त्यांनी मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण विभागात चौकशी केली. त्यावेळी त्यांना कॉल लेटर येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, 9 मार्च 2021 रोजी फिर्यादी यांची आरोपी शुभम सोबत ओळख झाली. त्याने माझी मंत्रालयात ओळख आहे. तुमचे कॉल लेटर काढून देतो, त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, असे सांगून फिर्यादी यांच्याकडून सहा लाख 66 हजार 500 रुपये घेतले.
आरोपीने फिर्यादी यांना तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या बनावट सहीचे पत्र देखील दाखवले. गीते यांना रुग्णवाहिका चालक म्हणून कामावर रुजू करून घ्यावे, असा मजकूर त्या पत्रात होता. त्यानंतर आरोपीने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांची सही असलेले महाराष्ट्र शासन असे लिहिलेले पत्र गीते यांना दिले. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे रुग्णवाहिका चालक पदावर रुजू होण्याबाबत मजकूर होता. तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.