मुंबई : संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि जळगाव येथे निदर्शने केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे.
पुण्यातील सारसबाग चौकात शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. गेली अडीच वर्षे राऊत सातत्याने भाजपच्या चुकांवर टीका करत आहेत. याचाच राग भाजपला होता. त्यामुळेच कारवाई झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच, जो भाजपात प्रवेश करतो, तो धुतल्या तांदळासारखा होतो. भाजपविरोधात बोलल्यास ईडीची कारवाई होते. संपूर्ण देशातील नागरिकांनी केवळ भाजपचाच झेंडा हातात घ्यायचा का?, असा सवालही शिवसैनिकांनी केला.
नागपूरात शेकडो शिवसैनिकांनी व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. या दरम्यान, रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 25 शिवसैनिकांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले.