मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्र्यांचे खाते वाटप आणि बंगले वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. खाते आणि बंगला यावरून देखील रुसवे – फुगवे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन शक्कल लढवली असून मंत्र्यांनाच, तुम्हाला कोणते मंत्रिमंडळ हवे, आणि कोणता बंगला हवा, याचे दोन – तीन पर्याय द्या, सांगितले आहे.
हे पर्याय निवडून मंत्र्यांना आज दिवसभरात आवडीची खाती आणि आवडीच्या बंगल्यांची नावे द्यायची आहेत. आता जवळपास सर्वच मंत्री हे फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते, यामुळे या मंत्र्यांना खाती आणि कोणता बंगला हवा याचे चांगलेच ज्ञान आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांना आधी राहत असलेलाच बंगला हवा की दुसरा कुठला ? हे ठरवायचे आहेत.
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या बाबतीत सुद्धा आवडी – निवडी असून त्या सुद्धा नेतृत्वाला जपाव्या लागणार आहेत. आपल्या पसंतीचा बंगला मिळविण्यासाठी या मंत्र्यांमध्येच शर्यत लागण्याची शक्यता आहे. या बंगल्यांसाठी सुद्धा त्यांना दोन – तीन पर्याय द्यायचे आहेत.
खातेवाटपाबाबत बोलायचे तर जवळपास सर्वांनाच मलईदार खाते मिळावे असे वाटत असते. परंतु आता खात्यासाठी मंत्र्यांना दोन ते तीन पर्याय द्यावे लागणार असल्याने पहिला की दुसरा पर्याय मंजूर होतो, हे त्यांना पहायचे आहे. मंत्रिमंडळात महसूल, अर्थ, सा. बांधकाम ही मलईदार खाती म्हणून ओळखली जातात.
एखाद्या मंत्र्याने एकाच खात्यावर अडून बसू नये, म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ही तीन पर्यायांची शक्कल लढवली आहे. मंत्र्यांनी जरी तीन पर्याय दिले तरी कुणाला कोणते खाते द्यायचे याबाबत शेवटचा निर्णय घेताना शिंदे – फडणवीसांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण यावरून रुसवे – फुगवे होऊ शकतात.
गृह, महसूल, अर्थ, सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती भाजपाकडे राहणार की, शिंदे गटाला मिळणार हे खातेवाटपानंतरच समजणार आहे. भाजपामध्ये विखे पाटील सर्वात ज्येष्ठ असल्याने त्यांना मोठे खाते मिळू शकते.
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. बच्चू कडूंनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. कॅबिनेट मंत्रीपदाची आशा मावळल्याने आता राज्यमंत्री पद तरी मिळेल का, अशी धाकधुक अनेक शिंदे समर्थक आमदारांना लागली आहे.