भाजपच्या प्रदेशाक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

0

मुंबई: चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

या स्पर्धेतच चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर होतं. त्यानुसार अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसं पत्रकही जारी करण्यात आलं आहे. बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. तर शेलार हे मराठा समाजातून येतात. त्यामुळे भाजपने मराठा आणि ओबीसी नेत्यांना महत्त्वाचे पद देऊन जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा भाजपला येत्या काळात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बावनकुळे यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.

चंद्रकांत पाटील हे राज्यात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांचं प्रदेशाध्यक्षपद रिक्त होतं. हे पद कुणाकडे जाणार याची जोरदार चर्चा होती. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेते ओबीसी असल्याने ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली होती. मात्र, बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात फडणवीस यांच्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही मोठा हात असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांची दुसऱ्यांदा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांची मंत्रिपदी वर्णी लागणल्यानंतर त्यांचं पद रिक्त होतं. त्यामुळे शेलार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच शेलार यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शेलार हे अजातशत्रू आहेत. सर्वच पक्षात त्यांचे राजकीय लागेबांधे आहेत. शिवाय ते आक्रमक नेतेही आहेत. अभ्यासू नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा महापालिका निवडणुकीत होणार असल्याने त्यांच्याकडे मुंबईची सूत्रे दिली असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच चंद्रशेखर बावनुकळे यांनी मिशन 200 आणि 45 चा नारा दिला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकण्याचे आणि लोकसभा निवडणुकीत 45 जागा जिंकण्याचे आमचे मिशन आहे. ते मिशन आम्ही पूर्ण करणारच, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. मला गावच्या अध्यक्षपदापासून ते विविध जबाबदाऱ्या दिल्या. त्या सर्व मी पार पाडल्या आहेत. या पुढेही कोणतीही जबाबदारी पार पाडणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.