विनायक मेटे यांचा चालक पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरु

0

पनवेल : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे 5.58 वाजेच्या सुमारास अपघात झाला. त्यांना तत्काळ मदत मिळाली नाही. ते तासभर घटनास्थळीच पडून होते. त्यानंतर सकाळी त्यांना पनवेल स्थित एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी बीडमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.

विनायक मेटे आपले एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या मृत्यूबद्दल काही नेत्यांनी तसेच शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. या अपघातात विनायक मेटे यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला किरकोळ जखम झाली आहे. अपघाताबाबत अधिक माहितीसाठी नवी मुंबई पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला आता रसायनी (रायगड जिल्हा) पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. अपघाताबाबत एकनाथ कदम याच्याकडून सविस्तर माहिती पोलिस घेतील. यासंबंधी त्याचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. विनायक मेटे यांचा अपघात झाला तेथील सीसी टीव्हीदेखील तपासण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.