पिंपरी : भोसरी येथे भर दिवसा दुकानात घुसून महिला व्यावसायिकेचा खून करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. कोणताही धागादोरा नसताना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
रामकिशन शंकर शिंदे (24,।रा. कारेगाव,शिरूर, मुळ हिंगेली) असे अटक आरोपीचे नाव असून त्याने 16 ऑगस्ट रोजी भोसरी लांडेवाडी येथे सकाळी दहाच्या सुमारास पुजा ब्रजकिशोर प्रसाद (31 रा. भोसरी) यांचा गळा चिरून खून केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून दिवसा झाला असला तरी आरोपी बद्दल कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती नव्हते. यासाठी गुन्हे शाखा व त्याच बरोबर गुंडा विरोधी पथक अशी दोन पथके तपास करत होती. यासाठी पोलिसांनी मागील दहा दिवसात चाकण परिसरातील 250 सीसीटीव्ही फुटेज तपासले.
नागरिकांशी संवाद साधला संशयीत आरोपीचा फोटो दाखवून चौकशी सुरु केली. यावेळी रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेचा मोबाईल व रोख दहा हजार रुपये असा ऐवज चोरणारा हा भोसरी येथील आरोपी असल्याचे समोर आले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तशी खात्री करण्यात आली. तपासाला वेग मिळाला तसे पोलिसांनी स्थानिक रहिवाश्यांशी चौकशी करण्यास सुरुवात केली असता फोटोतील इसम हा खंडोबा मंदिराच्या मागे उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला.
पोलीस तपासात आरोपीने हा खून त्याला पैशांची गरज असल्याने त्याने चोरीच्या उद्देशाने केल्याचे सांगितले आहे. आरोपीवर ठाणे शहर पोलीस ठाण्यात एक जबरी चोरीचा व दोन फसवणूकीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस अंमलदार प्रविण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे,गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनिल चौधरी,मयुर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, रामदास मोहिते, ज्ञानेश्वर गिरी, शुभम कदम व तौसीफ शेख यांनी केली.