वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जड वाहनांवर सायंकाळी बंदी

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने मुंबई-पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जड वाहनांवर सायंकाळी बंदी घातली आहे. ही बंदी 1 ते 30 सप्टेंबर दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल.

हिंजवडी वाहतूक विभाग अंतर्गत मुंबई पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील जग्वार शोरूम ते चांदणी चौकपर्यंतचा महामार्गाच्या भागाचा समावेश आहे. महामार्ग व त्याच्या लगत जोडले जाणारे इतर छोटे, मोठे रस्ते, हिंजवडी माण आयटी पार्क व पिरंगुट एमआयडीसीमधील कंपन्या तसेच आसपास रहिवासी व व्यावसायिक आस्थापना असल्याने या मार्गावर जड अवजड वाहनांची वर्दळ सतत सुरू असते.

त्यातच चांदणी चौक व सुचखंड येथे उड्डाणपूल व रस्ते विकसनाचे काम सुरू असल्याने उर्वरित रस्ते पादचारी नागरिक व सार्वजनिक वाहतुकीस अपुरे पडत आहेत. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या सत्रात चांदणी चौक, बावधन, पाषाण तलाव भागात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. महामार्गावर सतत वाहनांचे गंभीर/ किरकोळ/ प्राणांतिक स्वरूपाचे अपघात घडून येतात. बहुतांश अपघात हे जड वाहन चालकांचे वेगावर नियंत्रण न राहिल्यामुळे घडत आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने नवीन निर्बंध लागू केले आहेत.

सुस रोड – सुस खिंड पाषाण मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र 4 वरील चांदणी चौक कोथरूड/ कात्रज/ सातारा/ भुगाव रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंदी असेल. विद्यापीठ चौकाकडून भारत इलेक्ट्रॉनिक्स चौक बावधन पाषाण रोड मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. चार वरील चांदणी चौक/ कोथरूड/ कात्रज/ सातारा/ भुगाव रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंदी असेल. भुगाव मुळशी रोड कडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील चांदणी चौक बावधन कोथरूड कात्रज सातारा कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जर वाहनांना प्रवेश बंदी असेल.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील किवळे येथून चांदणी चौक/कोथरूड/ कात्रज/ साताराकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंदी असेल. एनडीए रोड कडून चांदणी चौक मार्गे सातारा बाजूकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांवर प्रवेश बंदी असल्याचे आदेश आनंद भोईटे (पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पिंपरी चिंचवड) यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.