शिंदे यांचे नाव बदलून श्रीमान खापरफोडे ठेवावे

0

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेने देखील आपला मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून यावरुन टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

वेदांता-फॉक्सकॉनची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते. त्यांना ‘फॉक्सकॉन’प्रमाणे मुंबई-ठाणे जिंकायचे आहे. त्यांना महाराष्ट्रातला शेती उद्योग संपवायचा आहे.” असा दावा शिवसेनेने केला आहे. “त्यांना महाराष्ट्राचे वैभव, लौकिक नष्ट करून महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे करायचे आहे.

शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे. शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत. शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे” असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

पुढे शिवसेनेने म्हटले आहे की, महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य असतानाही वेदांता-फॉक्सकॉन हा मोठा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला नेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल असे कंपनीचे पक्के वचन होते. जूनपर्यंत तरी कंपनीचे मन बदलले नव्हते, पण महाराष्ट्रात एक बेकायदा सरकार विराजमान होताच किमान 1 लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प गुजरातला वळवला गेला आहे. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर हा खूप मोठा हल्ला आहे, असे घणाघातही शिवसेनेने केला आहे.

पुढे शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या पैठण दौऱ्यावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच पैठण दौरा झाला. त्यांच्या गटाचे आमदार भुमरे यांचा हट्ट पुरविण्यासाठी मुख्यमंत्री पैठण यात्रेस गेले. तेथे एका मंडपात मुख्यमंत्र्यांची पेढे व लाडवांची तुला करण्याची योजना होती. त्यासाठी अनेक खोके भरून मिठाई तेथे आणली होती. शिंदे गटाचा खोक्यांशी संबंध जोडला जात असला तरी खोक्यातली मिठाई पाहून ‘तुला’ करण्याचे मुख्यमंत्र्यांनी नाकारले. त्यांनी मिठाईतुला नाकारताच त्या मांडवात जमलेल्या लोकांनी लाडू-पेढ्यांची अक्षरशः लूटमार केली. लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर लाडू-पेढे पळवून नेले. अगदी त्याच ‘लूटमार’ पद्धतीने गुजरातने महाराष्ट्रातला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पळवून नेला आहे, अशी तुलनाही यावेळी करण्यात आली.

याआधी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातने असेच पळवून नेले. आता फॉक्सकॉन हातचे गेले. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले. काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. मग हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. मग दोन वर्षे काय फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे व्यस्त होते? इतक्या मोठ्या प्रकल्पाविषयी दिरंगाई होत आहे याविषयी त्यांनी तोंडातून ‘ब्र’ काढल्याची नोंद कोणत्याही कॅबिनेट बैठकीत नाही, असा आरोपही करण्यात आला.

आमचा तर आरोप नव्हे, तर खात्रीच आहे. श्री. फडणवीस यांनी त्यांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून उचलून गुजरातच्या हवाली केले तसे मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या हातावर उदक सोडावे तसा सोडला. उद्या हे याच पद्धतीने मुंबईचा देखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत. फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे. ‘आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले. त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या’, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

त्यांना ‘फॉक्सकॉन’प्रमाणे मुंबई-ठाणे जिंकायचे आहे. त्यांना महाराष्ट्रातला शेती उद्योग खतम करायचा आहे. त्यांना महाराष्ट्राचे वैभव, लौकिक नष्ट करून महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे करायचे आहे. शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे. शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत. शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे. महाराष्ट्राने डोळे उघडे ठेवून पावले टाकायला हवीत, असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांची देखील खिल्ली उडवली.

Leave A Reply

Your email address will not be published.