मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरुन जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. बदल्यांच्या स्थगिती संदर्भातही देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिलंय. निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना स्थगिती दिली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्येच होतात, त्यावेळी 20 ते 30 टक्के बदल्या होतात, या नियमानुसारच बदल्या होतील असे सांगत असतानाच निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तात्काळ त्यावर निर्णय घेऊन अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत. उच्च पदासाठी पात्र असतानाही केवळ प्रशासकीय दिरंगाई होत असेल तर ते संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यावर हा अन्याय ठरेल, म्हणून पदोन्नतीचे प्रस्ताव प्रत्येक विभागाने मार्गी लावावे, सामान्य प्रशासन विभागाने त्याचा आढावा घेण्याचेही निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.