नवी दिल्ली : सर्वसामान्यांचा एखादा हप्ता थकला तरी त्यांच्या पोटात गोळा येतो. बँकेचे लोक घरी तर येणार नाही या चिंतेने सामान्य माणूस बेजार होतो. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते.
मात्र, दुसरीकडे गेल्या ७ वर्षात बँक घोटाळे किंवा फसवणुकीतून देशाचे झालेले नुकसान पाहिले तर आपले काही हजार रुपये त्यापुढे किती आहेत याचा विचार सर्वसामान्य व्यक्ती करत बसेल.कारण देशात दररोज १०० कोटी रुपयांचे नुकसान बँक घोटाळ्यातून झाल्याचे समोर आले आहे. मात्र, एकूण नुकसानीचे प्रमाणही वर्षानुवर्षे कमी होत आहे. माहिती अधिकारातून बँक घोटाळ्याची माहिती उघड झाली आहे.
सर्वाधिक बँक घोटाळे किंवा फसवणुकीच्या घटना महाराष्ट्रात झाल्या आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईचाही यात समावेश आहे. बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सुमारे ५० टक्के घोटाळे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत.
त्यापाठोपाठ दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. २०२१-२२ या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारत भरातील शाखांमध्ये ४ हजार १९२ कर्मचाऱ्यांनी ७ हजार कोटींचे घोटाळे केल्याची माहिती आरटीआय अंतर्गत देण्यात आली आहे.