मुंबई : हे आमचे घरचे कार्यालय आहे. ठाण्यातील लुईसवाडीत आमचे हे ऑफिस आहे. जो फोटो तुम्ही पाहिला, ती माझी स्वतःची खुर्ची आहे. मी आणि शिंदे साहेब स्वतः याठिकाणी बसतो. हे घर शासकीय नाही. मी वर्षा बंगल्यावर अथवा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलोय, अशा वावड्या उठवल्या जात असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी विशेष आणि तातडीची पत्रकार परिषद घेत आपल्यावर झालेल्या आरोपांना फेटाळून लावले आहे. शिंदे म्हणाले, मी आणि शिंदे साहेब दोघेही या ऑफिसचा वापर करतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून हजारो लोक याठिकाणी येतात, आम्हाला भेटतात. आपले गाऱ्हाणे मांडतात. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचे काम याच घरातून होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे छायातचित्र व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विटवर हा फोटो अपलोड केला होता. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एकनाथ शिंदे बसलेले दिसत आहेत. मात्र हे सर्व खोडसाळपणे केल्याचे खुद्द श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केले.
श्रीकांत शिंदे म्हणाले, या गोष्टी चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरु असेल आणि बदनामी केली जात असेल तर लोकांना मी ऐवढेच सांगू इच्छितो की, हे आमचे घर आहे. वर्षानुवर्षे आम्ही याठिकाणी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी बसतो. शिंदे साहेबही याचा वापर करतात. काल याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात महाराष्ट्र शासन लिहिलेला मुव्हेबल बोर्ड ठेवण्यात आला होता. आज मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स असल्याने त्याची पूर्वतयारी म्हणून तो बोर्ड येथे ठेवण्यात आला होता. मात्र फोटो काढणाऱ्याने मुद्दाम हा मुद्दा गाजवण्यासाठी असा फोटो काढला गेला.
श्रीकांत शिंदे म्हणाले, आधीच्या मुख्यमंत्र्यांचा जो अनुभव होता तो या मुख्यमंत्र्यांना लागू होत नाही. आधीचे मुख्यमंत्री एकाच ठिकाणी बसून राज्याचा कारभार हाकायचे, मात्र आत्ताचे मुख्यमंत्री फिरतीवर असतात. काम करत असतात. जिथे जिथे वेळ मिळेल तिथून ते काम करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था आहे. अनावधानाने तो बोर्ड माझ्या फोटोत आला.