मुंबई : जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. लोकांना बोलावून ते कसे आपल्यामुळे वेदांत सारखे प्रकल्प गेले हे सांगत आहेत, या शब्दात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरेंनी वेंदात-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला वळवण्यावरुन वडगाव-मावळ परिसरात जनआक्रोश मोर्चा काढत शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. त्यावर आज भाजप नेत्यांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
पुढे ते म्हणाले की, अंहकारापायी मुंबईची वाट लावली. मुंबई रेंगाळली, मेट्रोचा खर्च वाढला. त्यांनी कसे उद्योग पळवून लावले याची यादी मी करत नाही. त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि काय प्रकल्प आणले होते. याची यादी आणि घटनाक्रम मांडावा, असे आव्हाच चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले.
पुण्यात पीएफआय आंदोलकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, हा खूप संवेदनशील विषय आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून तपास यंत्रणा आपल्या देशात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. त्यामुळे देशात 2014 पासून देशात कुठेही हल्ला झाला नाही. काश्मीरमधील हल्ले-प्रतिहल्ले खूप कमी झाले. आता त्यांना सर्वांना अटक झाली आहे. सर्वांवर योग्य कारवाई होईल.
आदित्य ठाकरे म्हणाले की आमच्या अडीच वर्षांच्या काळात असे कधीच घडले नाही, असे पत्रकारांनी विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांच्या काळात कसे हिरवे झेंडे लागले हे विसरले का आदित्यजी. त्रिपुरामध्ये मशिद पाडल्याच्या अफवेनंतर अमरावती, औरंगाबाद, मालेगावमध्ये जमाव रस्त्यावर आला होता. हे विसरले का? सरकार गेल्यामुळे तुम्ही विमनस्क मनस्थितीत गेला आहात. त्यामुळे तुमच्या काळात काय झाले हे तुम्हाला आठवत नाही.