पिंपरी : आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून बेकायदेशीर रित्या वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलालास अटक करत पोलिसांनी तीन मुलींची त्याच्या तावडीतून सुटका केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने मंगळवारी (दि.27) केली आहे.
जगन्नाथ उर्फ काका परशु ठोंबरे (वय 55 रा. जाधव नगर, येरवडा) असे अटक आरोपीचे नाव असून 7498441545 या मोबाइल क्रमांकधारकावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष हे परिसरात तपास करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम काका नाव वापरून 7498441545 या क्रमांकावरून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवतो. मोबाईलवरुन फोटो पाठवुन मुलींची निवड करण्यास सांगुन दिघी, आळंदी, भोसरी परीसरातील वेगवेगळे हॉटेल लॉजेस गि-हाईकांना बुक करण्यास सांगुन त्या ठिकाणी रिक्षाने मुली पाठवुन दलालीचे काम करतो.
यावरून पोलिसांनी दिघी पोलीस स्टेशन हद्दीत लॉज बुक करुन त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवला व सापळा रचुन छापा टाकुन आरोपीला ताब्यात घेतले. त्या आरोपीच्या ताब्यातून तीन पिडीत मुलींची सुखरुप सुटका करण्यात आली. यावेळी आरोपीकडून पोलिसांनी रोख रक्कम दिड हजार रुपये, 90 रुपयांचे इतर साहित्य, 6 हजार रुपयांचा मोबाईल, 55 हजार रुपयांची एक टीव्हीएस कंपनीची रिक्षा असा एकुण 62 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिघी पोलीस ठाण्यात आरोपीवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उप निरीक्षक धैर्यशिल सोळंके, पोलीस उप निरीक्षक (श्रेणी) विजय कांबळे,पोलीस अमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.